उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमक्यांचे वारंवार फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्वतः अंबादास दानवे यांनी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर आय़ुक्तांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रार करताना ज्या क्रमांकावरून फोन आला, तो नंबरही दिलाय. ठोकून काढू, कापून टाकू अशा धमक्या दानवेंना दिल्याचं पोलिसांच्या तक्रारीतून समोर आले आहे. याबद्दल क्रांती चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
माहितीनुसार, गेल्या १२, १३ आणि १४ मार्च रोजी त्यांना अज्ञात नंबरवरून सतत फोन येत होते. १५ मार्च रोजी रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी पुन्हा फोन आला. ज्यामध्ये तुला कापून टाकू, ठोकून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दानवे यांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या घटनेमुळे माझ्या व कुटुंबियांच्या सुरक्षेस धोका संभवू शकतो. या घटनेची रीतसर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून केली आहे.
अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आरोपींवर तात्काळ कारवाई कऱण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून कऱण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आक्रमक झाले होते. त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली थेट भूमिका मांडली होती. त्यामुळेच त्यांना धमकी आली का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.