जलदगतीने मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचे दोन दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत तब्बल ८० हजारांहून अधिक वाहनांची प्रवास केला आहे. मंगळवारी या सागरी मार्गावर नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १२२ वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.
अटल सेतूवर दुचाकी
आणि तीनचाकी वाहनांना बंदी आहे. तरीही एका रिक्षाचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन
करत या मार्गावरून रिक्षा दामटवली. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी केलेल्या या
कारवाईत १४ जणांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी २८ हजारांचा दंड वसूल केला
आहे. तर न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी ११८ लोकांवर कारवाई करत १.३१ लाख रुपयांचा
दंड वसूल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक चेतन नामदास हा अटल सेतूवर रिक्षा चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कलम २७९ आणि ३३६ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. चेतन नामदास हा चिर्ले येथून मुंबईच्या दिशेने जात होता.
वाहतूक पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग केला असता
रिक्षाचालकाने रिक्षाचा स्पीड वाढवला. मात्र, पोलिसांनी त्याला चिर्ले येथून ७
किमी अंतरावर गाठले, असे
पोलिसांनी सांगितले. चेतन नामदासला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
महामार्गावर वाहतुकीच्या नियंमाचे उल्लंघन होऊ नये
यासाठी अटल सेतूवर रात्रंदिवस वाहतूक पोलीस कार्यरत असतात. त्यांच्यासाठी एखादी
जागा मिळावी, अशा
आशयाचे पत्र न्हावाशेवा वाहतूक पोलिसांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला
लिहले आहे.