बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयाने तब्बल १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता तपासादरम्यान या आरोपींकडून कोणती महत्त्वाची माहिती समोर येते, गोळीबारामागे नेमकं कारण काय होतं आणि या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील किला कोर्टाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींची चौकशी करून गोळीबारामागील नेमका कट उघड करण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न आहे. आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती.
तीन आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आरोपी आहेत. राजस्थानमधील कोटा येथून तीन आरोपींना, दिल्लीमधून चार आरोपी आणि गुजरातमधील बडोदा येथून अंकित नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधून अटक केलेल्या तीन आरोपींना ट्रान्झिट रिमांडद्वारे मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्यांना किला कोर्टात आज हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत पोलीस त्यांची सखोल चौकशी करणार आहेत.
आरोपींनी मोबाईल नष्ट केल्याची पोलिसांची माहिती न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी माहिती दिली, गोळीबाराच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन मोबाईल आरोपींनी नष्ट केले आहेत. हे मोबाईल शोधून काढणे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, आरोपींनी बेछूट गोळीबार केला असून या प्रकरणामागे मोठा कट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे या कटाचा उलगडा करण्यासाठी अधिक तपास आणि आरोपींची कोठडी आवश्यक आहे. या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कथित हस्तक अनिल पंडितचे नाव समोर येत असल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हे प्रकरण मोठे असल्याने आरोपींची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
न्यायालयीन कोठडीची मागणी दरम्यान, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या कोठडीच्या मागणीला विरोध केला. आरोपींचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडदरम्यान पोलिसांनी तपास केला असून आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी वकिलांनी केली. आरोपींना अटक करताना अटकेची कारणे योग्य प्रकारे सांगण्यात आली नसल्याचाही दावा बचाव पक्षाने केला.