मुंबई : अभिनेता सलमान खान एका पान मसाला कंपनीची जाहिरात केल्यामुळे अडचणीत आला आहे. याप्रकरणी सलमान खानसह हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
2023 या वर्षामध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हे बऱ्याच वादांमुळे चर्चेत राहिले आहेत. यामधील एक प्रकरण म्हणजे पान मसाला जाहिरात. पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी या आधी अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान यांना नोटीस पाठवण्यात आली होती. अक्षय कुमारने यासंदर्भात माफी देखील मागितली होती. आता पान मसाला जाहिरात केल्याप्रकरणी सलमान खान, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफला नोटीस पाठवण्यात आली आहे. यांच्यासोबत माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स पान मसाला कंपन्यांची जाहिरात करतात. यासंदर्भात लखनऊ हायकोर्टाचे वकील मोतीलाल यादव यांनी सलमान खान, हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग या सहा जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी या स्टार्सनी केलेला करार 15 दिवसांच्या आत संपुष्टात आणावा, असे या नोटीसमध्ये वकिलांनी लिहिले आहे. अन्यथा या स्टार्सची नावेही पान मसाला जाहिरात प्रकरणाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात जोडले जाऊ शकतात.
कायदेशीर नोटीस आल्यामुळे या सहाही स्टार्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी मोतीलाल यादव यांच्या याचिकेवर केंद्र सरकारने लखनऊ हायकोर्टाच्या निर्देशानुसार शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना नोटीस बजावली होती.