काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मथुरेच्या भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर भाजपाने रणदीप सुरजेवालांवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हरियाणा राज्य महिला आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना समन्स बजावले आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर केलेली टिपण्णी निषेधार्ह आहे. एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल असं विधान सुरजेवाला यांनी केल्याचं महिला आयोगाने म्हटलं आहे.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
रणदीप सुरजेवाला १ एप्रिलला हरियाणातल्या कुरुक्षेत्र या ठिकाणी असलेल्या एका गावात प्रचारासाठी गेले होते. सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ त्यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. “आपण लोकांना खासदार, आमदार म्हणून का निवडून देतो? तर ते आपलं म्हणणं मांडू शकतील. हेमा मालिनी यांच्यासारखं…####” असं म्हणत त्यांनी हेमा मालिनी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं.