मुंबई इंडियन्सचा टीम मध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२७ च्या सिझनसाठी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतलाय. वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर खेळाडू कायरन पोलार्ड याची टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी (हेड कोच) नियुक्ती करण्यात आलीये. मुंबई इंडियन्सने शनिवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. पोलार्ड याने यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणूनही आपली कामगिरी बजावली होती. आता खेळाडू आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर तो मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे.
मुंबई इंडियन्ससोबत १६ वर्षांचं नातं कायरन पोलार्ड वयाच्या २२ व्या वर्षी मुंबई इंडियन्स टीममध्ये दाखल झाला होता. गेल्या १६ वर्षांपासून तो या टीमशी जोडलेला आहे. खेळाडू म्हणून त्याने मुंबई इंडियन्सला अनेक संस्मरणीय क्षण दिलेत. त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही त्याने टीमला मार्गदर्शन केलं. आता त्याच्यावर संपूर्ण टीमची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
मुंबई इंडियन्सच्या सहमालक नीता एम. अंबानी यांनी पोलार्डच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, पोलार्ड हा मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळाडू म्हणून त्याने अनेक अविस्मरणीय क्षण दिलेत. प्रशिक्षक म्हणूनही त्याने त्याचा अनुभव, खेळाविषयीची आवड आणि खेळाची सखोल समज टीमसोबत शेअर केली आहे.
पोलार्डला मुंबई इंडियन्सची जर्सी घालण्याचा अर्थ काय आहे आणि टीमकडून खेळताना कोणत्या गोष्टींची गरज असते, हे चांगले माहीत आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही तो त्याच निष्ठेने, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने काम करेल असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केलाय. टीमच्या पुढील वाटचालीचं नेतृत्व करताना त्याला यश मिळावं, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. मुंबई इंडियन्सच्या खेळाची चांगली जाण कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सच्या टीमची रचना आणि मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना येणाऱ्या आव्हानांची चांगली माहितीये. टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झालेत. या बदलांचा त्याने जवळून अनुभव घेतलाय.
खेळातील बदल, सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रणनीती आणि वाढती स्पर्धा यांची पोलार्डला चांगली समज आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना आणि नंतर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करताना त्याने टीमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना त्याचा हा अनुभव उपयोगी ठरण्याची शक्यता आहे.