मी तर तुमचाच असं अहमदाबादच्या गुजरातींना ठासून सांगण्याचा प्रयत्न मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर चांगलाच उलटला... गुजराती पांड्याला गुजरातच्याच प्रेक्षकांनी रोहित- रोहितची नारेबाजी करत चांगलंच हैरान केलं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत अन् गुजरातचं कौतुक करत पांड्या पॅव्हेलियनमध्ये परतला.
हार्दिक पांड्याचा घोर अपमान झाला असं वाटेल. मात्र दोन हंगामात टांग देत मुंबईत कोलांटी उडी मारणाऱ्या हार्दिकला क्रिकेटमध्ये व्यक्ती नाही तर संघ मोठा असतो हे गुजरात टायटन्सला दाखवून द्यायचं होतं. त्यांनी ते पहिल्याच सामन्यात दाखवून देण्याचा प्रयत्न केला. 169 धावा चेस करणाऱ्या मुंबईला चांगलाच घाम फोडला. मोहित शर्मानं टाकलेलं ते 18 वं षटक टर्निंग पॉईंट ठरलं. गुजरातचं 169 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईनं खराब सुरूवातीनंतर डाव सावराल होता. रोहित शर्मानं 43 अन् डेवाल्ड ब्रेविसनं 46 धावा करत मुंबईची सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती.
मात्र किशोरनं रोहितची अन् मोहितनं ब्रेविसची शिकार केली अन् मुंबईची पकड सुटली. मोहितच्या प्रभावी माऱ्यासमोर टिम डेव्हिड अन् तिलक वर्माची डाळ शिजली नाही. 3 षटकात 36 धावांची गरज होती त्यावेळी मोहितनं 18 व्या षटकात फक्त 9 धावा देत टीम डेव्हिडची महत्वाची विकेट घेतली. त्यानंतर तिलक अन् पांड्याने काही फटके मारून सामना पुन्हा खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र आधी स्पेन्सरने तिलक वर्मा नंतर उमेश यादवने हार्दिक पांड्याला बाद करत मुंबईचा हा प्रयत्नही हाणून पाडला. हार्दिक पांड्या लवकर फलंदाजी करण्यासाठी आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. मात्र कॅप्टनचा निर्णय मुंबईच्या पराभवाचं एक कारण ठरला.
गुजरातच्या फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर नाणेफेक हार्दिकनं जिंकली होती. त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या तीन षटकात 30 धावा करत शुभमन गिलनं हार्दिकच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटवल्या होत्या. मात्र जसप्रीत बुमराहनं साहाचा त्रिफळा उडवला अन् गुजरातच्या फलंदाजीला पहिलं खिंडार पाडलं. तरी कर्णधार शुभमन साई सुदर्शनसोबत किल्ला लढवत होता. धावगती थोडी मंदावली मात्र परिस्थिती तशी नियंत्रणातच होती.
तिकडं हार्दिक पांड्या आपला अनुभवी स्पिनर चावलाच्या हातात बॉल सोपवला. त्यानंही निराश न करता लंबी रेस का घोडा शुभमन गिलला आपली खेळी 31 धावांवर आटोपती घ्यावी लावली. पाठोपाठ अझमतुल्ला देखील कोटझीची शिकार झाला. मात्र साई सुदर्शननं एक बाजू लावून धरली होती अखेर बुमराहने त्याची झुंजार खेळी 45 धावांवर संपवली. पाठोपाठ धोकादायक डेव्हिड मिलरलाही जास्त संधी न देता पॅव्हेलियनमध्ये धाडलं.
बुमराहने अशा तीन तगड्या शिकारी करत आपलं पुनरागमन दणक्यात साजरं केलं. गुजरातची अवस्था 5 बाद 134 धावा अशी झाली असताना राहुल तेवतियाने आपली मॅच फिनिशरची चुणूक दाखवून दिली. त्यानं 18 व्या ओव्हरमध्ये 19 धावा चोपल्या. मात्र बुमराहने पुन्हा शेवटच्या षटकात मुसक्या आवळल्या म्हणून गुजरातला 168 धावात रोखता आलं.