आजपासून आयपीएलचा धुमधडाका ; यंदा प्रथमच 'ह्या' नियमाचा समावेश
आजपासून आयपीएलचा धुमधडाका ; यंदा प्रथमच 'ह्या' नियमाचा समावेश
img
दैनिक भ्रमर
जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या सतराव्या पर्वाला आजपासून प्रारंभ होत आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या दोन संघांमध्ये सलामीची लढत होणार आहे. यंदा या स्पर्धेत बरेच बदल पाहायला मिळत असून लीगचे दोन मोठ्या फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी आपले कर्णधार बदलले आहेत.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्या तर सीएसकेने महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व दिले आहे. याशिवाय काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. स्पर्धेेचा प्रारंभ बॉलीवूड स्टार्सच्या अदाकारीने होणार आहे.

2008 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे हे सतरावे वर्ष आहे. या काळात स्पर्धेचा यशाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. सुरुवातीच्या काळात 8 संघ होते; परंतु आता या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत आहेत. या संघांमध्ये दोन महिन्यांच्या काळात जवळपास 55 ते 60 सामने होतात.

देशात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले असून यात 7 एप्रिलपर्यंत एकूण 21 सामने होणार आहेत. दुसर्‍या टप्प्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. 2009 आणि 2014 या साली देशात लोकसभेच्या निवडणुकीमुळे स्पर्धा देशाबाहेर खेळवण्यात आली होती; परंतु 2019 आणि यंदा ही स्पर्धा देशातच होत आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 चा उद्घाटन सोहळा आज (22 मार्च) रोजी सायंकाळी 6.30 वाजता चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सेरेमनीला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारख्या स्टार्सची उपस्थिती आणि त्यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. आपल्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध करण्यासाठी ए.आर. रहमान आणि सोनू निगम ही या सेरेमनीसाठी चेन्नईमध्ये असतील. या परफॉर्मन्सव्यतिरिक्त यापूर्वी कधीही न पाहिलेला एआर (ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी) चे प्रदर्शन देखील असेल जे ओपनिंग सेरेमनीचे खास वैशिष्ट्य आहे.

दोन बाऊन्सरला परवानगी

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये नवीन नियम आणण्यात आले आहेत. मागील पर्वात एका षटकात गोलंदाजाला एकच बाऊन्सर टाकता येत होता; परंतु आता बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे दोन बाऊन्सरची परवानगी दिली होती, तोच नियम आयपीएल 2024 मध्ये दिसणार आहे. बीसीसीआयने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दोन बाऊन्सरचा नियम आणला होता. पण, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आयसीसीने एका षटकात एक शॉर्ट बॉल टाकण्यास परवानगी दिलेली आहे; परंतु त्याचवेळी कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये दोन बाऊन्सरचा नियम आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group