महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा झटका दिला आहे. CNG आणि PNG च्या दरात वाढ करण्यात आली असून, मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. या दरवाढीचा परिणाम वाहनचालकांसह घरगुती गॅस ग्राहकांवरही होणार आहे. नेमकी किती रुपयांनी दरवाढ झाली आणि आता CNG-PNG साठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या सविस्तर.
पुणेकरांसह पिंपरी-चिंचवड आणि नाशिकमधील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे. CNG आणि घरगुती PNG गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यानुसार, 12 आणि 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत. CNG च्या दरात प्रतिकिलो 1 रुपये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG चा नवीन दर 99 रुपये 75 पैसे प्रतिकिलो झाला आहे. तर घरगुती पाइप्ड नॅचरल गॅस म्हणजेच PNG च्या दरात प्रति SCM 1 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे PNG चा नवीन दर 51 रुपये 75 पैसे प्रति SCM असणार आहे.
गॅसच्या इनपुट खर्चात आणि आयात केलेल्या LNG च्या किमतीत वाढ झाल्यामुळे दरवाढीचा निर्णय घेतल्याचं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, पेट्रोलच्या तुलनेत CNG वापरल्यास 45 टक्के, तर डिझेलच्या तुलनेत 20 टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचा दावा MNGL ने केला आहे.
एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना आता वाहनचालकांसह घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.