मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आज आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची बातमी समोर आली आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. मुंबई अंडरवर्ल्डमधील शेकडो गुन्हेगारांचा खात्मा केल्यामुळे त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. दरम्यान, आयकर विभागाने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर धाड टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत
मिळालेल्या माहितीनुसार , माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घराव आयकर विभागाने ही कारवाई केलीय. शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी येथील घरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यानी झाडाझडती घेतली. छाप्यामध्ये नेमकं काय हाती लागलं याची माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान, अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवास भोगला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत.अँटिलियावर जवळ सापडलेल्या एसयूव्ही कार मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती तपासात उघड झाली.
त्यानंतर मनसुख हिरेन याची हत्या झाली होती. हिरेन याची हत्या करण्यात प्रदीप शर्मा यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मदत केली होती. राष्ट्रीय तपास संस्थेनं या प्रकरणाचा छडा लावत जून २०२१ मध्ये शर्मा यांना अटक करण्यात आली होती. अंबानी कुटुंबीयांना धमकावण्याच्या कटात सहभागी असलेल्या मनसुख हिरेनला संपवण्यासाठी सचिन वाझे याला प्रदीप शर्मानं साथ दिल्याचा एनआयएचा दावा होता.