महसूल गुप्तचर संचालनालयाने (DR) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर, रविवार ताब्यात घेतले.
या महिला प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता ती नेत असलेल्या वस्तू उदा. बुट, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली आणि अँटी-पर्स्पिरंट्स हे विलक्षण जड होते. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीत या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या शिताफीने लपवलेली पांढरी पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटचा वापर करून या पदार्थाची चाचणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
एकूण 1979 ग्रॅम पांढऱ्या पावडरच्या रुपातील जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे बाजार मूल्य अंदाजे 19.79 कोटी आहे. यावेळी या महिला प्रवाशाने आपला जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली.त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने भारतातील मादक द्रव्यांच्या धोक्याशी लढा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पूनरुच्चार केला तसेच, प्रतिबंधित अमली पदार्थ लपविण्याची नवीन पद्धत शोधून पुन्हा उच्च व्यावसायिक मानके स्थापन करण्यात रस दाखवला.
भारत-नेपाळ सीमेवरून अमली पदार्थाची तस्करी
दरम्यान, याआधी डीआरआयने एका अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. डीआरआय अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीत सुमारे 15 कोटी रुपये मूल्याचे 1.59 किलो कोकेन जप्त केले होते. ही टोळी आफ्रिकेतून भारत-नेपाळ सीमेवरून भारतात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या पदार्थांची (एनडीपीएस ) तस्करी करत होती.