मुंबई : विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून गुप्तचर महसूल विभागाच्या १३ आणि १४ ऑक्टोबर दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार येथे सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटद्वारे कार्यरत असलेल्या दोन परिसरांची झाडाझडती घेतली. या दोन्ही ठिकाणी छापा टाकून DRI ने ७ किलो २२ ग्राम सोने जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, हाती आलेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी झवेरी बाजार येथील दोन ठिकाणी सोन्याची तस्करी करत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे .
यातील पहिल्या ठिकाणी, कायदेशीर खरेदीचा कोणताही पुरावा नसलेली आणि परदेशी शिक्का असलेली १ किलो सोन्याची बिस्किटे सापडली. पहिल्या धाडीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका ठिकाणी घातलेल्या छाप्यात परदेशी बनावटीचे ७.०२२ किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले 1,22,10,000/- रुपये (भारतीय चलन) ताब्यात घेण्यात आले.
सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी आणखी ४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यापैकी एका ठिकाणी सोने वितळवण्याचे काम सुरु असलेले आढळून आले. अशा प्रकारे, या धाडींतून परदेशी बनावटीचे 4,78,74,547 रुपये मूल्याचे तस्करी करून आणलेले 8.022 किलो सोने आणि सोन्याच्या विक्री व्यवहारातून मिळालेले 1,22,10,000/- रुपये असा एकूण ऐवज ताब्यात घेण्यात आला.
यापैकी एका ठिकाणचा व्यवस्थापक, जो या टोळीचा सक्रीय सदस्य आहे आणि ज्याच्याकडून परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले, त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तसेच टोळीतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.