ज्या घरामध्ये 40 ते 45 वर्षापासून राहत आहे. त्याच घरात परत येत असल्याने नवीन असे काहीच नाही. नाराजी दूर झाल्याने पुन्हा घरवापसी करत आहे. येत्या पंधरा दिवसांत केंद्रीय नेत्यांनी तारीख दिल्यानंतर दिल्ली येथे भाजपात प्रवेश होईल, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवार (दि. ७) येथे सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खडसे पुढे म्हणाले की, भाजपमध्ये परत येण्याची प्रक्रिया ही आताची नाही. मागील चार-पाच महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती. जुने व ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये नाथाभाऊ तुम्ही आता पाहिजे होतात. मात्र, मी त्यांना सांगितले होते की, माझी राजकीय परिस्थिती पाहता मी सध्या प्रवेश घेऊ शकत नाही. मात्र, आता भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप माझे घर असल्याने स्वगृही परत येतोय. भाजपच्या पायाभरणीपासून घर होईपर्यंत मी काही ना काही योगदान दिलेले आहे. काही नाराजीमुळे बाहेर पडलो होतो. आता ती नाराजी दूर झालेली आहे.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन भाजप प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पंधरा दिवसांत दिल्ली येथे प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मला संकट काळात आधार दिला. त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सर्व कल्पना दिली आहे. त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त झाल्यानंतरच भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही खडसे यांनी सांगितले.