पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रवेशपूर्व चाचणी म्हणजेच पेट मेअखेरीस घेतली जाणार आहे. यंदाची पेट पहिल्यांदाच ऑनलाइन होणार आहे. परीक्षेसाठी सोलापूरसह अकलूज, पंढरपूर व बार्शी येथे ऑनलाइन केंद्रे असतील. तसेच कोल्हापूर, सातारा, लातूर व धाराशिव याठिकाणी देखील परीक्षेची केंद्रे असणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून पेट परीक्षेत बदल करण्यात आले आहेत. ७ नोव्हेंबर २०२२च्या निर्णयानुसार आता पीएचडीला प्रवेश घेतल्यानंतर संबंधित संशोधकास मार्गदर्शन करणारे गाइड त्या पदव्युत्तर महाविद्यालयात प्राध्यापक असणे आवश्यक आहे. आता विद्यापीठासह जिल्ह्यातील अनेक उच्च महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय झाली आहे.
विद्यापीठातील विविध संकुलांप्रमाणे त्या-त्या महाविद्यालयांमध्ये देखील संशोधकांना पीएचडी पूर्ण करता यावी हा त्यामागील हेतू आहे. तसेच पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना निवडलेल्या विषयासंदर्भातील ज्ञान ज्याठिकाणी मिळेल त्याठिकाणी जाऊन संशोधन करता येईल. तत्पूर्वी, सोलापूरसह विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी यासाठी सोलापूरशेजारील जिल्ह्यांमध्ये देखील ‘पेट’साठी केंद्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. एमए, एमकॉम, एमएससी, एमएड अशा पदव्युत्तर पदवीसाठी शिकणाऱ्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही पेट देता येणार आहे.
नेट-सेट उत्तीर्ण उमेदवारांना ‘पेट’चे बंधन नाही
वरिष्ठ महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (युजीसी) घेतली जाणारी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ‘सेट’चेही असेच आहे. या उमेदवारांना ‘पीएचडी’च्या पेट देण्याचे बंधन नाही, असेही ‘युजीसी’ने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पीएचडीधारकांसाठी आता बार्टी, सारथी यासह १० ते १२ फेलोशिप मिळतात. तसेच केंद्र व राज्य सरकारकडूनही अनुदान दिले जाते. याशिवाय विद्यापीठाच्या संकुलात पीएचडी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना देखील विद्यापीठाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे आता पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्यांना पदरमोड करण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.