अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी सभेवरून रणकंदन सुरू आहे. खासदार नवनीत राणा आणि बच्चू कडू यावरून आमने-सामने आले. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्या सभेसाठी बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदान २४ तारखेला बूक केलं होतं. पण ऐनवेळी जिल्हा परिषदेने परवानगी नाकारली आणि त्याच मैदानात अमित शहा यांच्या सभेला परवानगी दिली आहे. यावरून बच्चू कडू आक्रमक झाले होते. ही दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले की, गृहमंत्र्यांनी कायदा तोडला आहे. त्यांनी सभा घ्यायला नको पाहिजे होती. आम्हाला परवानगी दिली होती आणि त्यांना नाकारली होती. कायद्याच्या राज्यात असं झालं तर जो संदेश जाणार आहे तो वाईट आहे. भितीच्या वातावरणात अशा दडपशाहीमुळे चिंता व्यक्त करणारे फोन आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही निषेध केला. भाजपची ही संस्कृती नाही. भाजपची संस्कृती बिघडवली जात आहे. काय जादू टोणा केला स्वाभिमानने भाजपवर ते माहिती नाही.
माझी बाजू घेणाऱ्यांचे आभारच मानतो. न्यायप्रिय लोकांना न्यायाच्या बाजूने उभा राहिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टीत पक्ष पाहिला तर न्याय राहिलाच नाही. २६ तारीख आहे आपल्याजवळ आणि जनता न्याय देईलच. आता खरी लढाई सुरू झाली. जिथं जिथं दोन नंबर धंदे सीपी चालवतो. रोज तीन तीन कोटींचा जुगार चालतो, हे अमरावतीत चालतं, अशी संस्कृती आम्ही अमरावतीतून घालवू असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.
अमरावती दंगल होऊ नये म्हणून आम्ही माघार घेत आहे. आमच्याशी लोक स्वतःहून जुळले. आमच्या सभांना लोकांनी गर्दी केली, पैसे द्यावे लागले नाहीत. पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी आमची सभेची परवानगी नाकारली. जिल्हाधिकारी असे वागतात त्यांना लाज आहे की नाही असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
हनुमान जयंतीला हजारो रुपये देऊन लोक जमवले असा आरोप बच्चू कडू यांनी रवी राणांवर केला. घटनेचे नियम अधिकाऱ्यांनी पायदळी तुडवले. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा फेकला जातोय. शांततेसाठी आम्ही दोन पाऊल मागे आलो. आम्ही मागे आलो नसतो तर रक्तपात झाला असता असंही बच्चू कडू म्हणाले.