नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी खलिस्तानवादी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्या प्रकरणात भारतावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. कॅनडाने भारतीय उच्चाधिकाऱ्याला हटवल्यानंतर आता भारतानेही कारवाई केली असून, कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्याची हाकालपट्टी करण्यात आली आहे.
खलिस्तानी समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या घटनेत भारतीय एजंटचा हात असल्याचा आरोप करत, कॅनडा सरकारनं भारतीय राजदूतांना हटवलं होतं. कॅनडाच्या या कारवाईला भारतानं जशास तसं उत्तर दिलं आहे.
भारतानं कॅनडाच्या दूतावासातील एका वरिष्ठ राजदूताला हटवलं असून, पाच दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप या राजदूतावर आहे. तसेच भारताविरोधी कारवाईत सामील असल्याचंही म्हटलं आहे.
दरम्यान भारतानं कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स बजावले होते. त्यानंतर भारत सरकारनं कॅनडाच्या वरिष्ठ राजदूताला हटवलं आहे. या कारवाई संदर्भातील माहितीही कॅनडाच्या उच्चायुक्तांना देण्यात आली आहे. संबंधित राजदूताला पुढील पाच दिवसांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले जात आहे.