EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला "हा" मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंटच्या नियमांत एक मोठा बदल केला आहे. मृत्यू झालेल्या अनेक खातेधारकांचे आधार पीएफ खात्याशी लिंक नसते किंवा आधार कार्ड आणि पीएफ खात्यावर त्यांची माहिती जुळत नाही. 

त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यावर करावयाच्या प्रक्रियेत ईपीएफओने बदल केला आहे. या निर्णयामुळे ईपीएफओ खातेधारकाच्या कुटुंबीयांची डोकेदुखी कमी होणार आहे. 

कुटुंबीयांना पीएफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी

आता पीएफ खातेधारकाचे नॉमिनी खातेधारकाच्या आधार डिटेल्सशिवायदेखील पीएफची रक्कम मिळवू शकतात. ईपीएफओने नुकतेच एक सर्क्यूलर जारी केले होते. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार ईपीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांना मृत खातेधारकाच्या माहितीची त्याच्या आधार कार्डशी जुळवाजुळव करताना, पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा स्थितीत मृत खातेधारकाच्या कुटुंबीयांना पीएफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी येतात.  

ही अडचण येऊ नये म्हणून ईपीएफओने आता नवा नियम केला आहे. कारण पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे आधार आणि पीएफ खाते लिंक न करताच भौतिक आधारावर पडताळणी करून अशी प्रकरणं निकाली काढण्यात येतील. प्रांत अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच अशा प्रकरणांत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पीएफची रक्कम मिळेल. फसवणूक होऊ नये म्हणून प्रांत अधिकाऱ्यांकडून पीएफ खातेधारकाच्या नॉमिनीची पडताळणी केली जाईल.  

नवा नियम कोठे लागू होणार 

ज्या पीएफ खातेधारकाची माहिती ईपीएफ यूएएनवर बरोबर आहे मात्र ही माहिती आधार कार्डशी जुळत नसेल तर अशा स्थितीत हा नवा नियम लागू होईल. एखाद्या खातेधारकाची माहिती आधार कार्डवर बरोबर आहे पण ही माहिती यूएएनवर चुकीची असेल तर त्यासाठी नवी प्रक्रिया आणि वेगळा नियम आहे. 

दरम्यान आधार डिटेल्स न नोंदवताच एखाद्या ईपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत नॉमिनी असलेल्या व्यक्तीच्या आधारवरील माहिती सिस्टिममध्ये अपडेट केली जाईल तसेच नॉमिनीला सही करण्याची परवानगी दिली जाईल. एखाद्या मृत ईपीएफ खातेधारकाचे नॉमिनी नसतील तर अशा स्थितीत कायद्याच्या दृष्टीने जो उत्तराधिकारी ठरेल त्याचे आधार जमा करण्यास ईपीएफओकडून परवानगी दिली जाईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group