वैतरणात तीन जण बुडाले, शोध आणि बचावकार्य सुरू
वैतरणात तीन जण बुडाले, शोध आणि बचावकार्य सुरू
img
Dipali Ghadwaje
 इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये आलेल्या पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू आणि पाण्यात बुडणे आणि अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी दुपारी वैतरणा धरणात मुंबईचे तीन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. मागील आठवड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे.

घोटी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि माहीतगार व्यक्तींकडून शोधकार्य सुरू केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा वेगात आणि जास्त प्रवाहाने होत असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. पाणी बंद करण्याचे अधिकार मुंबई मनपाला असल्याचे स्थानिक यंत्रणेने सांगितले. धरण परिसरातील झारवड शिवारात दोन जण बुडाले तर एक जण वावी हर्ष शिवारात बुडाल्याची माहिती समोर येत आहे.

बचाव पथक शोधकार्य करण्यासाठी रवाना झाले आहे. अद्याप बुडालेल्या व्यक्तींची नावे समजली नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अपघात व पाण्यात बुडाल्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: वैतरणाचा प्रवाह खोल दरीतून जात असल्यामुळे तो अधिकच घातक ठरत आहे.

दरम्यान, धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये आणि खोल पाण्यात उतरू नये. स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी मदत घ्यावी. पाण्याचा खोलीचा अंदाज घेऊनच पाण्यात उतरावे. वैतरणा नदी अतिखोल असल्याने अशा धोकादायक ठिकाणी पर्यटकांना बंदी घालावी, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group