कळवण : तालुक्यातील सुळे ग्रामपंचायतीने "मेरी मिट्टी, मेरा देश" हा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला. येथील महिला राधिका व कणसरा बचत गटाच्या आदिवासी महिलांनी पारंपरिक आदिवासी पेहराव सोबत फडकी परिधान करून संबळ, पिपाणी वाद्यावर नृत्य करीत पंचायत समितीचा परिसर अधिकारी कर्मचारी व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
अनेकांना या आदिवासी पेहरावातील नृत्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये घेण्याचा मोह आवरता आला नाही. या नंतर सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती वंदना सोनवणे यांचेकडे हा "अमृत कलश" सोपवण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाने गेले वर्षभर विविध कार्यक्रम हाती घेतले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सुळे गावात स्वच्छता अभियान राबविले, घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले, गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जि प प्राथमिक शाळा गावातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता अभियान राबविले, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व पोस्टर स्पर्धा घेतल्या आहेत, प्लॉस्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम राबविली.
आदी उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान हा अमृत कलश पंचायत समितीत आणण्यापूर्वी गावात ग्रामस्थ, जिप शाळेतील विद्यार्थी, राधिका व कणसरा महिला बचत गटाच्या महिला यांनी सहभाग घेत गावात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमृत कलशाचे पूजन करून पंचायत समिती कार्यालयात आणण्यात आला.
यावेळी सरपंच भारती चव्हाण, उपरारपंच कविता बागुल, सदस्या राधा भोये, प्रमिला गावित, प्रमिला बागुल, अलका गायकवाड, विमल बागुल, धवळी गांगुर्डे, पुष्पा बागुल, मयुरी बागुल, रेश्मा गायकवाड, प्राथमिक शिक्षिका मीना पवार, ग्रामसेविका देवका ठाकरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.