उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत १२० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.
त्यानंतर आता पाच दिवसांनी 'भोले बाबा' म्हणजेच सूरजपाल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले आहेत. भोले बाबांनी हाथरस चेंगराचेंगरीबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
या घटनेबाबत भोले बाबा म्हणाले की, २ जुलै रोजी घडलेल्या घटनेने मी दु:खी आणि व्यथित आहे. २ जुलै रोजी हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला.
त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. याप्रकरणात आतापर्यंत बाबांच्या सेवेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे आता भोले बाबा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडले आहे.
हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेवर सूरजपाल उर्फ भोले बाबा यांनी एका व्हिडिओ निवेदनातून आपलं म्हणणं मांडले आहे. “२ जुलैच्या घटनेनंतर मी खूप दुःखी आहे. प्रभुने आम्हाला या दु:खावर मात करण्यासाठी शक्ती देईल यावर सर्वांचा विश्वास आहे. सर्वांनी सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवा. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. मी माझे वकील ए.पी. सिंग यांच्यामार्फत समिती सदस्यांना विनंती केली आहे की, त्यांनी शोकग्रस्त कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर साथ द्यावी,” असे भोले बाबा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी सूरजपाल सिंग उर्फ भोले बाबा आणि या प्रकरणातील सर्व आरोपींच्या कॉल रेकॉर्ड तपशीलांवर हाथरस चेंगराचेंगरीनंतर घडलेल्या घटनांचा क्रम पुन्हा तयार केला. चेंगराचेंगरी झाल्यामुळे सत्संग स्थळ सोडल्यानंतर भोले बाबा यांनी काय केले याबद्दल पोलिसांनी अनेक महत्त्वाचे तपशील उघड केले.
चेंगराचेंगरी झाली जेव्हा अनेक लोक त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी धावत आले होते. चेंगराचेंगरीनंतर बाबा दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातून निघून गेले. त्यानंतर भोले बाबा यांना त्यांचे मुख्य संयोजक देव प्रकाश मधुकर यांचा दुपारी २.४८ वाजता फोन आला आणि त्यांनी त्यांना चेंगराचेंगरीची माहिती दिली. दुपारी ३ ते ४.३५ दरम्यान बाबांचे फोन लोकेशन त्यांच्या मैनपुरी आश्रमात सापडले. या प्रकारानंतर बाबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक फोन केले. त्यानंतर बाबांचा मोबाईल फोन ४,३५ नंतर बंद झाला आणि तेव्हापासून त्याचे लोकेशन सापडले नाही.