गंगापूर धरण
गंगापूर धरण "इतके" टक्के भरले, इतर धरणांची अशी आहे आजची स्थिती
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : जून महिन्यासह जुलैचे तीन आठवडे पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नाशिक शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेले गंगापूर धरण अवघे ४२.४५ टक्के भरले आहे.

मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यातच गंगापूर धरणातून संभाजीनगरमधील जायकवाडी या प्रचंड आकाराच्या धरणासाठी पाणी सोडावे लागते. जलसंसाधन खात्याच्या निकषानुसार १५ ऑगस्टपर्यंत धरणे भरणे अपेक्षित आहे. त्यासाठी अवघा तीन आठवड्यांचा अवधी आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

जुलैच्या तिसर्‍या आठवड्यातील धरणांची स्थिती पाहता गंगापूर धरण ४२.४५ टक्के भरले आहे, तर त्र्यंबकेश्वरजवळील गौतमी गोदावरी धरण ४२.५६ टक्के भरले आहे. तरीही गंगापूर धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठा क्षमतेच्या फक्त ३५.०५ टक्के इतकाच आहे. त्यामुळे गोदावरी खोर्‍यात जोरदार पावसाची गरज आहे.

हेही वाचा : महत्वाची बातमी! ‘लाडकी बहीण योजने’त आणखी सहा नवीन बदल ; वाचा सविस्तर

जिल्ह्यातील इतर धरण समूहांची परिस्थिती पाहिली असता इगतपुरी तालुक्यातील भावली हे धरण नाशिक जिल्ह्याच्या तुलनेने मुंबईकडील बाजूला येते. त्यामुळे ते ९६.५१ टक्के भरले आहे. मुंबई, नवी मुंबई व पालघर या जिल्ह्यांना आतापर्यंत पावसाने चार-पाच वेळा झोडपून काढले आहे. त्यामुळे भावली धरण भरले आहे. पाठोपाठ दारणा धरण ७४.२६ टक्के व कडवा धरणा ६३.४५ टक्के भरले आहे. तरीही धरण समूहाची उपलब्ध पाण्याची टक्केवारी ५३.२२ टक्के आहे. त्यात मुकणे व वालदेवी या धरणांच्या परिसरात जोरदार पावसाची गरज आहे.

कळवण-देवळा परिसरातील गिरणा खोरे धरण समूहातही पाणीसाठा कमीच आहे. चणकापूर धरणात ८.९८ टक्के, हरणबारी धरणात १४.७ टक्के, केळझर धरणात ८.०४ टक्के व गिरणा धरणात ११.७५ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. या भागातही जोरदार पावसाची गरज आहे. पालखेड धरण समूहात पालखेड, करंजवण व वाघाड या तीन धरणांत अत्यल्प म्हणजे ५.६४ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, तर ओझरखेड, पुणेगाव व तिसगाव धरणांत चक्क शून्य टक्के म्हणजे पाणीच उपलब्ध नाही. कळवण तालुक्यातील पुनद धरणात ४० ते ४८ टक्के जलसाठा असला, तरी माणिकपुंज धरण कोरडे आहे.

जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहता जिल्ह्याचा एकूण पाणीसाठा अवघ्या २६.२२ टक्के इतकाच उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामीण नागरिक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group