स्टार प्लस वरील मालिका ‘अनुपमा’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी रुपाली गांगुली सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. त्याचवेळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यातही मोठी घटना घडली अनुपमा मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे, त्यामध्ये एक कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला हा इसम स्टार प्लस च्या ‘अनुपमा’ या शोसाठी कॅमेरा असिस्टंट म्हणून काम करत होता. मात्र तेथे वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ‘अनुपमा’ च्या सेटवर ही कथित दुर्घटना झाली. मालिकेचे शूटिंग सुरू असताना कॅमेरा असिस्टंटच्या पायाला वीजेचा शॉक लागला. या घटनेची माहिती मुंबईतील आरे कॉलनी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मालिकेच्या सेटवर जाऊन चौकशीही केली. मात्र राजन साही यांच्यातर्फे या घटनेसंदर्भतात अद्याप कोणतीही अधिकृत स्टेटमेंट जाहीर करण्यात आलेले नाही.
खरंतर या मालिकेसाठी वापरलेले कॅमेरे हे थर्ड पार्टी म्हणजेच इतर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असतात आणि या कॅमेऱ्यासोबत सेटवर कॅमेरा असिस्टंटही असतात. कॅमेरा आणि कॅमेरा असिस्टंट दोन्ही थर्ड पार्टीकडून येतात. कॅमेरा असिस्टंटची सुट्टी असेल तर त्या दिवशी कंपनीतर्फे दुसरा कॅमेरा असिस्टंट दिला जातो. अनुपमाच्या शूटिंगसाठी ‘साई व्हिडिओ’ कंपनीचे कॅमेरे वापरले जातात. कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूनंतर साई व्हिडीओने त्याच्या कुटुंबीयांना काही रक्कम भरपाई म्हणून दिली आहे आणि त्याचे पार्थिव बिहारमधील त्याच्या घरी नेण्याचा खर्चही कंपनी उचलत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कॅमेरा असिस्टंटचा भाऊ सध्या मुंबईत आला आहे. तो आपल्या भावाचे पार्थिव बिहारमधील त्यांच्या घरी घेऊन जाईल, जेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची अवस्था अतिशय वाईट झाली असून ते शोकाकुल आहेत. मात्र, या घटनेसंदर्भात चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.