Vidhansabha Election 2024;  निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ? वाचा सविस्तर
Vidhansabha Election 2024; निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले ? वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा निकाल समोर आला असून महाविकास आघडीसाठी अतिशय धक्कादायक असा निकाल समोर आला आहे. दरम्यान ,  या निकालावर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 “विधानसभेचा निकाल लागला. पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे. पटला नाही तरी लागला आहे. कसा लागला हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. पण तरीही जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडीला मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं दिसतं. सर्व सामान्य जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच  ते  पुढे  म्हणाले “जे आकडे दिसत आहे, ते पाहिल्यावर या सरकारला अधिवेशनात मंजुरीसाठी बिल मांडण्याची गरज नाही असे आकडे आहेत. थोडक्यात विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही, एक दीड वर्षापूर्वी भाजपचे तूर्तास असलेले अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते, एकच पक्ष राहील. म्हणजे त्यांना वन नेशन वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय अशी भीतीदायक चित्र आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

“हा निकाल पाहिला तर मी ज्या काही प्रचार सभा घेतल्या. राज्यभर आम्ही फिरलो. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का. कापसाला भाव नाही म्हणून दिली का?राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहे त्यासाठी दिले का. महिलेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली त्यासाठी मते दिली का. कळत नाही,. प्रेमापोटी नाही पण रागापोटी अशी ही लाट जणूकाही उसळली हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचं गुपित काही दिवसात शोधावं लागणार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तूर्त मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो निराश होऊ नका. खचून जाऊ नका. काही लोकांचं म्हणणं आहे हा ईव्हीएमचा विजय आहे. असूही शकतो. पण जनतेला निकाल मान्य असेल तर कुणालाच काही बोलण्याची गरज नाही. पण मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू. मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group