कॉलेज तरुणीला पाहून किळसवाणं कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच तरुणाला  बेड्या ; नेमकं काय घडलं ?
कॉलेज तरुणीला पाहून किळसवाणं कृत्य, व्हिडीओ व्हायरल होताच तरुणाला बेड्या ; नेमकं काय घडलं ?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : टॅक्सीतून प्रवास करताना कॉलेज तरुणीला पाहून किळसवाणं कृत्य करणाऱ्या एका तरुणाला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला आरोपीनं हा प्रकार केला होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.

मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी आपल्या मूळगावी उत्तरप्रदेशात पळून गेला होता. यानंतर आता पोलिसांनी उत्तर प्रदेशात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार , दिनदयाळ मोतीराम सिंह असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी असून तो मुंबईत सायन इथे राहत होता. इथल्या एका फरसाणच्या दुकानात तो कामाला होता. घटनेच्या दिवशी ३० नोव्हेंबरला आरोपी दिनदयाळ मुंबईतील ग्रँट रोड परिसरात गेला होता. यावेळी कंबाला हिल बसस्टॉपवरून एक कॉलेजची तरुणी या शेअरिंग टॅक्सीत चढली. तिलाही ग्रँट रोड बस स्थानकावर जायचं होतं.

दरम्यान, आरोपी दिनदयाळ याने टॅक्सीतून प्रवास करत असताना पीडित तरुणीकडे पाहून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली होती. पण हा सगळा प्रकार टॅक्सीत पीडितेसोबत असलेल्या मित्राने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. हा प्रकार गावदेवी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीच्या मित्राशी संपर्क साधला आणि सर्व घटनाक्रम जाणून घेतला. यानंतर १२ डिसेंबरला पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवायला सुरुवात केली. त्याची ओळख पटताच आरोपी उत्तर प्रदेशला आपल्या मूळगावी पळून गेल्याची माहिती गावदेवी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं, त्याने विनयभंग केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group