मराठी रुपेरी पडदा गाजवणारे ज्येष्ठ  अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्या अडचणीत वाढ ! नेमकं काय घडलं?
मराठी रुपेरी पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्या अडचणीत वाढ ! नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : एकटेपणाला कंटाळलोय , मला इच्छामरण तरी द्या , अशी मागणी करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांचा व्हिडिओ कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने पोस्ट केला होता.

त्यानंतर मनमोहन माहिमकर यांची संपूर्ण परिस्थिती समोर आली होती. त्यांनी सरकारकडे इच्छामरणाची मागणी केली होती. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओनंतर मनमोहन माहिमकर यांना अनेकांनी मदत केली होती. पण तेच मनमोहन माहिमकर आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

एकेकाळी मराठी रुपेरी पडदा गाजवणारे मनमोहन माहिमकर यांना राहण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यांचं राहत घर विकावं यासाठी नातेवाईकांकडून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मनमोहन माहिमकर हे गिरगावात सदाशिव लेनमधील जुन्या इमारतीत राहतात. त्यांच्या इमारतीचा पुर्नविकास होणार आहे. पण त्याआधीच त्यांचे नातेवाईक त्यांना घर विकण्याची मागणी करत आहेत.

आपली व्यथा मांडत माहिमकर म्हणाले, ‘‘दोन वर्षांनी नवीन घराचा ताबा मिळणार आहे. पण, थोरला भाऊ जगदीश आणि वहिनी रेखा माझ्यावर खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत. वहिनी वारंवार धमक्या देत आहे. पोलिसांकडे मदत मागितली  पण, कौटुंबिक प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले.’’

माहिमकर यांनी सांगितलं की, पुर्नविकास करणाऱ्या बिल्डरने खोलीचे भाडे दिले नाही. त्यामुळे सध्या राहत असलेल्या खोलीचे 13 हजार रुपये महिन्याचे भाडे द्यावे लागते. ते देण्यासाठी एफडी मोडावी लागली. बिल्डरने इतरांना भाडे दिले पण आम्हाला दिले नाही.

मनमोहन माहिमकर यांना सरकारकडून पाच हजार रुपये पेन्शन मिळते. पण औषध, जेवण, घरभाडे यासाठी त्यांना महिन्याला एकूण 12-15 हजार रुपये खर्च येतो. माहिमकर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून पेन्शन मिळत होती पण आता तीही बंद झाली आहे.

त्यामुळे एकीकडे आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे भाऊ - वहिनीचा दबाव अशा दुहेरी दुष्टचक्रात माहिमकर अडकले आहेत.

मनमोहन माहिमकर यांनी नटसम्राट, छत्रपती ताराराणी सारख्या 29 मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी आणि गुजराती सिनेमात काम केलं आहे. ‘अशी जाते अक्कल’ या सिनेमातून 37 वर्षांपूर्वी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group