बंगळुरू : देशातील दिग्गज आयटी कंपनी , इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती क्रिस गोपालकृष्णन, माजी IISc संचालक बलराम आणि इतर १६ जणांवर सोमवारी एससी/एसटी (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७१ व्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने (सीसीएच) निर्देश दिल्यानंतर कर्नाटकातील बेंगळुरू येथील सदाशिव नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयआयएससी फॅकल्टी किंवा IISc बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य क्रिस गोपालकृष्णन यांच्याकडून तात्काळ कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका फॅकल्टी सदस्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला गेला. क्रिस गोपालकृष्णन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण
बोवी आदिवासी समुदायाचे तक्रारदार दुर्गाप्पा IISc च्या सेंटर फॉर सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमध्ये फॅकल्टी मेंबर असलेले दुर्गाप्पा यांनी आरोप केला की त्यांना २०१४ मध्ये हनी ट्रॅप प्रकरणात खोटे गुंतवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. अहवालानुसार, दुर्गाप्पाने आरोप केला आहे की त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या दिल्या गेल्या. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये गोविंदन रंगराजन, श्रीधर वॉरियर, संध्या विश्वेश्वरय्या, हरी केव्हीएस, दासप्पा, बलराम पी, हेमलता मिशी, चट्टोपाध्याय के, प्रदीप डी सावरकर आणि मनोहरन यांचा समावेश आहे.