काल अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शेवटच्या क्षणी मोठा गोंधळ निर्माण झाला. मॅटवरील अंतिम सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याच्याविरोधात निर्णय दिल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन पै. शिवराज राक्षे याने मोठा गोंधळ सुरू केला. पंचांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
यामुळे आता राज्यभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दुसरीकडे पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांनी या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरच आरोप केला आहे. यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा फिक्सिंग होती असा मोठा आरोप पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पैलवान शिवराज राक्षेवर कारवाई
काल झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मॅटवरील अंतिम सामना पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. पण. या डावात शेवटच्या क्षणी पंचांनी मोहोळ याला विजयी घोषित केले. पण, यावेळी पै.शिवराज राक्षे याची पाठ पूर्ण टेकली नसल्याचा दावा राक्षे याने केला. पण पंचांनी हा दावा फेटाळून लावला. शिवराज राक्षे याने रिप्लाय दाखवण्याची मागणी केली. पण, तीही मागणी फेटाळून लावली.
यावेळी पै.शिवराज राक्षे आणि पंचांमध्ये मोठा वाद सुरू झाला. दरम्यान, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारल्याचे समोर आले आहे. यामुळे राक्षे याला तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे
पैलवान शिवराज राक्षे याचे कुटुंबीय काय म्हणाले?
एका मराठी वृत्तवाहिनीने पैलवान शिवराज राक्षे याच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतली. यावेळी कुटुबीयांनी महाराष्ट्र केसरी २०२५ च्या स्पर्धा फिक्सिंग असल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना शिवराज राक्षे यांच्या आई म्हणाल्या, पंचांनी असा निर्णय द्यायला नको होता. पंचांनी चूक मान्य केली नाही. त्यांनी त्यावेळी पुन्हा दाखवायला हवे होते. ते दाखवले नाही. माझा मुलगा एवढ्या वर्षे कुस्ती खेळत आहे, असं काही करणार नाही आम्हाला माहित आहे. आतापर्यंत आम्ही पाहिले आहे, ते दरवेळी चुकीचा निर्णय देतात. शिवराजने आतापर्यंत कुस्तीत दहा कुस्त्या जिंकल्या आहेत. शेवटच्या कुस्तीत त्यांनी असा निर्णय घेतला. आमच्या मुलाची मागणी फक्त रिप्लाय दाखवण्याची होती. मॅटवर खेळायला जात असतानाच शिवीगाळ केली होती, असं करायला को होतं.
निलंबित करणे हा निर्णय चुकीचा आहे, गरिबाच्या मुलावर अन्याय करायला नको. पंचांवर पण कारवाई व्हायला पाहिजे. सगळीच मुलं गरीब घरातील असतात, त्यामुळे फक्त मुलांवर कारवाई नको, पंचांवरही कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी पैलवान शिवराज राक्षे यांच्या आईने केली.
"आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठिमागे आहे. पंचांनीच आधी अन्याय केला आणि नंतर त्यांनीच कारवाई केली. याआधी पंचांकडे न्याय मागायला गेले त्यावेळी पंचांनी शिवी दिली होती. आता तुम्ही चुकीचा निर्णय होता असं मान्य करताय, मग आता तुमच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. आता आम्हालाही न्याय पाहिजे, अशी मागणी पै. शिवराज राक्षे यांच्या कुटुंबीयांनी केली.