अहिल्यानगर येथे झालेली ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे. या वादावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील कुस्तीपटू पृथ्वीराज मोहोळ मानाची गदा पटकावण्याच्या मानकरी ठरला.
दरम्यान या सामन्यापूर्वी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात पृ्थ्वीराज मोहोळचा सामना डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेसोबत झाला. या सामन्यादरम्यान महाराष्ट्र केसरीला गोंधळाचे गालबोट लागले. पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन शिवराज राक्षे संतापला. त्यानंतर शिवराजने पंचांची कॉलर ओढली आणि त्यांना लाथही मारली. दरम्यान आता या वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले चंद्रहार पाटील?
शिवराज राक्षेने पंचांना लाथ घातलेल्या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया देताना चंद्रहार पाटील म्हणाले, ' खरं तर काल जो प्रकार घडला तो चुकीचा होता. पण मी चुकीचा इतकाच म्हणेल की, पंचांना शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजवर जो अन्याय झालाय, त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे. असं माझं स्पष्ट मत असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं.
यापूर्वी २००९ मध्येही चंद्रहार पाटील यांच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला होता. याबाबत बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले की,'जो अन्याय शिवराजसोबत झालाय तोच अन्याय २००९ मध्ये माझ्यासोबतही झाला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो.
मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि ६ मिनिटांची कुस्ती दीड तास सुरु ठेवल्यामुळे मी जो अन्याय सहन केला होता, तोच अन्याय आज शिवराजला सहन करावा लागत आहे. कुस्ती झालीये की नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. या प्रकरणात शिवराजची कुठलीही चूक नाही. असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय.