अमेरिकेतील ड्रग्सची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे फेंटानिल नावाच्या ड्रगचे उत्पादन बंद करण्याची मागणी अमेरिकेने केली होती. यानंतर आता चीनने ही मागणी मान्य करत याचे उत्पादन थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे. या ड्रगमुळे अमेरिकेत गेल्या वर्षात तब्बल 70 हजार जणांचा बळी गेला होता.
फेंटानिल हे एक सिंथेटिक ड्रग आहे. यावर्षी एकट्या सॅन फ्रान्सिस्को शहरातच या ड्रगमुळे 619 जणांचा बळी गेला आहे. या ड्रगला चायना टाऊन, चायना व्हाईट अशा नावांनी देखील ओळखलं जातं. 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या APCE परिषदेमध्ये बायडेन आणि जिनपिंग यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली होती
अमेरिकेतील एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेंटानिल हे एक सिंथेटिक ओपिऑईड आहे. 1998 साली अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने याचा पेनकिलर म्हणून वापर सुरू केला होता. यासोबतच कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. फेंटानिल हे मॉर्फिनपेक्षा 100 पटींनी तर हेरॉइनपेक्षा 50 पटींनी अधिक प्रभावी आहे.
याच फेंटानिलचा वापर दुसरीकडे ड्रग म्हणूनही केला जातो आहे. याच्या अतिसेवनाने अमेरिकेत दरवर्षी हजारो नागरिकांचा बळी जातो. फेंटानिल हे लिक्विड, पावडर आणि गोळ्यांच्या स्वरुपात देखील उपलब्ध होतं. आय ड्रॉप्स, नेझल स्प्रे अशा रुपातही हे उपलब्ध होतं. त्यामुळेच याची तस्करी आणि वापर हा चिंतेचा विषय बनला आहे.