भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक सध्या सुरू असून, ६ जून रोजी पतधोरण जाहीर केले जाईल. या बैठकीत रेपो रेट किती घटवला जाईल, याची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक च्या रिसर्च रिपोर्टमध्ये रिझर्व्ह बँक यावेळी ०.५० टक्क्यांनी, म्हणजेच ५० बेसिस पॉईंट्सने रेपो रेट कमी करू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कर्जाच्या चक्राला गती देण्यासाठी आणि सध्याच्या आर्थिक अनिश्चिततांचा परिणाम कमी करण्यासाठी असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
रेपो रेटमध्ये दोनवेळा कपात
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक ४ जून ते ६ जून दरम्यान सुरू राहील. या बैठकीत जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, त्याची घोषणा ६ जून .रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेट ०.५० टक्क्यांनी घटवण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळात रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला होता. मात्र, सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोनवेळा रेपो रेट घटवला आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये दोन्ही वेळा प्रत्येकी ०.२५ टक्क्यांनी रेपो रेट घटवण्यात आला आहे. सध्या रेपो रेट ६ टक्क्यांवर आहे. आता रिझर्व्ह बँक तिसऱ्यांदा दिलासा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.