कसोटी क्रिकेटचा थरार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे अधिक रंगतदार झाला असतानाच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद एक ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 2027-29 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये काही देशांसाठी कसोटी सामने पाच नव्हे, तर चार दिवसांचे असतील, असा मोठा बदल केला जाणार आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसाठी पाच दिवस कायम
ICC अध्यक्ष जय शाह यांनी नुकत्याच पार पडलेल्या लॉर्ड्सवरील WTC फायनलमध्ये झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मात्र, यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन प्रमुख क्रिकेट देशांना पारंपरिक पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांची परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये ऍशेस, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी यांसारख्या प्रतिष्ठित मालिका पाच दिवसांच्या स्वरूपातच होतील.
कसोटी क्रिकेटचे आयोजन आणि ब्रॉडकास्टिंग खर्च यामुळे अनेक लहान क्रिकेट बोर्ड पाच दिवसांच्या मालिकांना नकार देत आहेत. त्यामुळे चार दिवसांत एक कसोटी सामना खेळवण्याची संकल्पना पुढे आणली गेली आहे.
या निर्णयामुळे तीन कसोटी सामने तीन आठवड्यांत पूर्ण होऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे. यामुळे वेळ आणि संसाधनांची बचत होईल, आणि खेळ अधिक व्यावसायिक आणि आकर्षक बनेल, असा ICC चा विश्वास आहे.