पणजी, २७ जून २०२५ : गोवा सरकारने आज अधिकृतपणे जाहीर केले की दुसरा आंतरराष्ट्रीय पर्पल महोत्सव ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गोव्यात आयोजित केला जाणार आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने हा भव्य महोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदाची थीम "युनिव्हर्सल डिझाइन आणि समावेशकता" ही असून, सर्वांसाठी सुलभ व समावेशक समाजनिर्मितीच्या दिशेने गोव्याचे हे महत्त्वाचे पाऊल आहे.
या महोत्सवाची घोषणा करताना मा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, पर्पल महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर मानसिकता बदलण्याची चळवळ आहे. गोवा असा समाज घडवण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे समावेश ही एक विशेष बाब नसून एक नैसर्गिक जीवनशैली असेल. हा महोत्सव केवळ गोव्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सकारात्मक संदेश पोहोचवेल.
या महोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून कार्यशाळा सुरू होतील तसेच त्यापुढील चार दिवसांमध्ये अनेक सांस्कृतिक, सामाजिक व अनुभवात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी सादर केलेली कार्यशाळा, सामाजिक संस्थांचे प्रदर्शने आणि सामान्य नागरिकांसाठी अनुभवात्मक विभाग सुद्धा असतील, जेथे दिव्यांगांचे जीवन अनुभवता येईल.
या महोत्सवात भारतासह विविध देशातील प्रतिनिधी, तज्ज्ञ, कलाकार आणि संस्था सहभाग नोंदवणार आहेत. पर्पल महोत्सव २०२५ चा मुख्य उद्देश, प्रेरणा देणे, सक्षमीकरण करणे आणि समाजात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवणे हा आहे.
गोवा सरकार सर्व नागरिकांना आणि संस्थांना या जागतिक स्तरावरील समावेशकतेच्या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.