गोव्यातील अर्पोरा येथील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात २० कर्मचारी, चार पर्यटक आणि एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश होता. पण त्याहूनही धक्कादायक म्हणजे क्लबचे मालक आणि मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे घटनेनंतर देश भारतातून पळून थायलंडला गेले होते.
भारत सरकारने थायलंड सरकारकडे लूथरा बंधूंना अटक करण्याची आणि त्यांना भारतात प्रत्यार्पित करण्याची औपचारिक विनंती केली होती, यानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. थायलंड पोलिसांनी लुथरा बंधूंना फुकेतमधून ताब्यात घेतले आहे.
भारत आणि थायलंडमध्ये २००३ पासून प्रत्यार्पण संधी लागू आहे. या संधीचा आधार घेत भारत सरकारने फुकेतमधील थायलंडच्या अधिकाऱ्यांकडे लूथरा बंधूंना अटक करण्याची विनंती केली होती. भारतीय एजन्सीज थाई अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. लवकरात लवकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लूथरा बंधूंना भारतात आणले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
७ डिसेंबरच्या मध्यरात्री क्लबला आग लागली आणि घटनेच्या काही तासांतच, ७ डिसेंबरच्या पहाटे ५:३० वाजता लूथरा बंधूंनी इंडिगोच्या विमानाने थायलंडमधील फुकेत येथे पळ काढला होता. गोव्यातील या संवेदनशील घटनेमुळे राज्याच्या आणि केंद्राच्या दबावानंतर प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत.
लूथरा बंधूंचा आंतरराष्ट्रीय प्रवास थांबवण्यासाठी भारत सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. यामुळे ते थायलंडबाहेर प्रवास करू शकणार नाहीत. इंटरपोलद्वारे त्यांच्याविरुद्ध 'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली होती.