भाषण करताना , नाचताना किंवा कोणासोबत बोलताना अचानक मृत्यू झाल्याचं आपण ऐकतो. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. याचे कारण हार्ट अटॅक असू शकते. दरवर्षी लाखो लोक हृदयविकारामुळे मृत्यूमुखी पडतात. 2022 मध्ये सुमारे 2 कोटी लोकांचा मृत्यू फक्त हार्ट अटॅकमुळे झाला असल्याचं आकडेवारी सांगते.
हार्ट अटॅकचा धोका जसाजसा वाढतो आहे तसंच प्रत्येकाने याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे. जीवनशैलीत योग्य बदल करून आणि आहार सुधारून आपण हृदयाचे आरोग्य सुधारू शकतो आणि हृदयविकारापासून धोका कमी करू शकतो. हार्ट अटॅकचे वेळीच लक्षणं ओळखून वेळेत CPR दिला आणि उपचार मिळाले, तर रुग्णाचा जीव वाचवता येतो. मात्र अनेक केसेसमध्ये हार्ट अटॅकचं कोणतंही लक्षण दिसत नाही अशावेळेस मात्र धोखा जास्त वाढतो. सायलेंट हार्ट अटॅक हा याचेच एक उदाहरण आहे.
सुमारे 20% हार्ट अटॅकचे प्रकार ‘साइलेंट’ असतात, म्हणजे कोणतीही ठळक लक्षण दिसत नाहीत. कधी कधी हृदय अचानक रक्त पंप करणं बंद करतं किंवा धडधड अचानक अनियमित होते, आणि तेही हार्ट अटॅकचं कारण बनतं. अशा वेळी रुग्णाला फक्त थोडी अस्वस्थता वाटते किंवा तो बेशुद्ध होतो. मात्र योग्य निदान केल्यानंतरच समजतं की हार्ट अटॅक आला होता.
साइलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?
साइलेंट हार्ट अटॅक म्हणजे असा हार्ट अटॅक ज्यामध्ये व्यक्तीच्या छातीमध्ये तीव्र वेदना, श्वास घ्यायला त्रास अशी सामान्य लक्षणं दिसत नाहीत. हा प्रकार मुख्यतः महिलांमध्ये आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जास्त दिसतो.
साइलेंट हार्ट अटॅकची लक्षणे
या हार्ट अटॅकमध्ये लक्षणं इतकी सौम्य असतात की सामान्यतः लोक याकडे दुर्लक्ष करतात. ही लक्षणं सामान्य वाटू शकतात, त्यामुळे लोक त्याला हार्ट अटॅक समजतच नाहीत.
सततचा थकवा
अपचन
चक्कर येणं
अंगावर शहारा येणं
शरीर सुस्त वाटणं
कोणाला आहे सर्वाधिक धोका?
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, काही जोखीमीचे घटक लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जास्त वजन (BMI 25 पेक्षा जास्त) असणाऱ्यांना हा धोका असतो. त्याचप्रमाणे व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह तसंच कुटुंबात हार्ट डिसीजचा इतिहास हे सगळे घटक असतील, तर तुम्हाला साइलेंट हार्ट अटॅकचा धोका असू शकतो. अशा वेळी डॉक्टरांकडे तपासणी करणं गरजेचं आहे.