दिल्लीच्या पहाडगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माजी प्रियकराने आपला साखरपुडा मोडल्याच्या रागातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाचा साखरपुडा झाला होता. मात्र, नंतर तरुणीला कळलं की, आरोपी तरुण काहीही काम करत नाही आणि तो बेरोजगार आहे. त्यामुळे तरुणीने सहा महिन्यांपूर्वीच त्याच्याशी झालेला साखरपुडा मोडला. ही गोष्ट आरोपी तरुणाला अजिबात आवडली नाही. साखरपुडा तुटल्यापासून तो सतत तरुणीचा पाठलाग करत होता आणि तिला त्रास देत होता. इतकंच नाही, तर सोशल मीडियावरही तो तिला धमक्या देत होता.
आरोपी तरुण थेट तरुणीच्या ऑफिसमध्ये घुसला आणि त्याने मोठा गोंधळ घातला. त्यानंतर त्याने तरुणीचा हात पकडला आणि तिला फरफटत ऑफिसमधून बाहेर रस्त्यावर आणलं. रस्त्यावरही त्याने तिच्यासोबत हाणामारी करायला सुरुवात केली. हा सर्व प्रकार सुरू असतानाच, तिथून गस्त घालणाऱ्या पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला पकडलं आणि तरुणीचा जीव वाचवला.