दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आलीय. गेल्या अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. आता त्या दोघांनी साखरपुडा केला आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एका खासगी समारंभात साखरपुडा केल्याची माहिती मिळतेय. शिवाय विजयच्या टीमने लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी एका खासगी समारंभात साखरपुडा केला आहे. हा सोहळा अगदी मोजक्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याचं बोललं जातंय. जरी दोन्ही कलाकारांकडून अद्याप अधिकृत घोषणाच झालेली नाही, तरी सोशल मीडियावर या बातमीने धुमाकूळ घातला आहे.
विजय आणि रश्मिकाच्या नात्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही काळापासून होत आहेत. पण त्यांनी कधीही उघडपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. दोघेही बरेचदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. ते अनेकदा रेस्टॉरंटमध्ये डेट्सवर जातात, तसेच एकत्र फिरायला जातात. दोघांचे एकाच लोकेशनवरील फोटोही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे चाहते बऱ्याच काळापासून त्यांच्याकडून आनंदाची बातमी येईल, अशी वाट पाहत आहेत. आता त्यांच्या साखरपुड्याची बातमी आल्याने चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मिका व विजय दोघेही पुढील वर्षी फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करू शकतात. पण अद्याप कोणतीही निश्चित तारीख समोर आलेली नाही. लवकरच लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल, असं म्हटलं जातंय.