तुळजापूरातील सांगवी मार्डी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमात फसवणुकीनंतर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून एका तरुणाला अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आली आहे. योगेश काळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
आधी योगेशचं अपहरण केलं. नंतर त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोळ्यावर, तोंडावर, आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, अद्याप आरोपी मोकाट आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
योगेश काळे या तरुणाचे गावातील एका तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. साखरपुडा झाल्यानंतर तरूणीनीनं योगेशसोबत बोलणं टाळलं. धक्कादायक म्हणजे तिने योगेशच्याच मित्रासोबत विवाह केला.
त्यानंतर त्यानं व्हॉट्सअॅपवर एक स्टेट्स ठेवला. 'प्रेमात धोका मिळाला', अशा आशयाचं त्यानं स्टेट्स ठेवलं होतं. आणि याच कारणावरून रोहीत बागल, चेतन माने आणि सत्यवान चादरे, योगेशच्या या मित्रांनी मिळून त्याचं अपहरण केलं. तसेच निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर धाराशिव पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दहा दिवस उलटून गेले तरी, अद्याप तिन्ही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने केली.