रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. आपल्या सुरक्षेसाठी अमेरिका किंवा NATO च्या भरवाशावर राहता येणार नाही, हे युरोपमधील देशांच्या लक्षात आलं आहे.
त्यामुळेच दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर युरोपमध्ये पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या विकासाची स्पर्धा सुरु झाली आहे. ज्यात सर्वात आघाडीवर जर्मनी असून ते शस्त्रास्त्र निर्मितीवर तितका पैसा खर्च करत आहे.
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या या युगात ड्रोन एक घातक, अचूक वार करणारं शस्त्र बनलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणारी एक कंपनी त्यापुढचा विचार करत आहे. ते कॉकरोच म्हणजे झुरळ आणि मानवरहीत AI बेस्ड शस्त्रांचे इवेंट आयोजित करत आहे.
युरोपच्या आत अनेक छोटे-छोट देश आहेत. तिथे शस्त्रांच्या विकासासाठी वेगवेगळे नियम आहेत. दुसरीकडे Lockheed Martin, RTX, बोईंग या अमेरिकन कंपन्यांची आधीपासून शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेवर पकड आहे.
सॅटलाइट, फायटर जेट्स आणि स्मार्ट शस्त्रांच्या निर्मितीत या कंपन्या अव्वल आहेत. त्यात आता जर्मनीने एक निर्णय घेतलाय. 2029 पर्यंत ते आपल्या संरक्षण खर्चात तीन पट वाढ करणार आहेत. 162 अब्ज युरो (जवळपास 175 अब्ज डॉलर) तरतूद करणार आहे.
दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर जर्मनीला अमेरिकेने सुरक्षेची गॅरेंटी दिली. जर्मनीला मर्यादीत प्रमाणात सैन्य क्षमता वाढवण्याची परवानगी देण्यात आली.
त्यामुळे जर्मनीने आपल्या संरक्षण खर्चात कपात करुन दुसऱ्या ठिकाणी खर्च करायला सुरुवात केली. रशिया-युक्रेन युद्धानंतर जर्मनीच्या लक्षात आलय की, आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहणं धोक्याचं ठरु शकतं.
सायबोर्ग कॉकरोच काय आहे?
जर्मन सरकारने देशाच्या सैन्य स्टार्टअपमध्ये फंडिंग सुरु केलं आहे. त्यामुळेच जर्मनीने हेरगिरी करणारी झुरळं, मानवरहीत पाणबुडी आणि AI आधारित टँकच्या निर्मितीचा कार्यक्रम सुरु केला आहे. Swarm Biotactics नावाची कंपनी सायबोर्ग कॉकरोच बनवत आहे. शत्रूच्या भागात जाऊन सहजतेने माहिती गोळा करण्यासाठी अशा झुरळांची निर्मिती करत आहे. या झुरळाच्या हालचाली इलेक्ट्रिक सिग्नलने कंट्रोल करता येतात.