सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांचे अपहरण करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाच जणांनी त्यांचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नागेश मडके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मागील काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर व्हायरल आहे. हे एक नॉन व्हेज हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दररोज अनेक ग्राहक येत असतात. काही दिवसापूर्वी या हॉटेल मालकाने नवीन फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. या गाडीची चर्चा जोरदार झाली होती. दरम्यान, आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली.
नागेश मडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते हॉटेल बाहेर उभे होते. त्यावेळी तिथं आलेल्या एका चारचाकी गाडीतून काही लोक आले. त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढायचा असल्याचे सांगितले. सेल्फीच्या बहाण्याने जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन गेले.
गाडीतच ४ ते ५ जणांनी मारहाण केली असे त्यांनी म्हटले आहे.
या अपहरणकर्त्यांनी त्यांना पाच किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. ह्याला मारुन टाकू, मरेपर्यंत सोडायचे नाही. ह्याला मारुन टाकायचं अन् पुलात फेकून द्यायचं अशी धमकी ते देत होते. त्यांनी पुढे वडगावच्या पुलावर फेकून दिले, असा खळबळजनक दावा स्वतः भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंनी केला आहे. दरम्यान, मला याआधाही धमकीचे फोन आले होते. त्यानंतर असा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे मडके यांनी सांगितले आहे.