धाराशिवमधील हॉटेल 'भाग्यश्री' हे सातत्याने चर्चेत असतं. सुरुवातीला हॉटेलमधील पदार्थ, नंतर हॉटेल मालकाने केलेल्या अनोख्या पद्धतीच्या जाहिरातीचं आणि नंतर तिथे होणाऱ्या गर्दीने. या सगळ्या गोष्टींमुळे हॉटेल भाग्यश्री हे कायम चर्चेत राहिलं आहे. त्यानंतर हॉटेल बंद असल्याने बॅनरची केलेली तोडफोड, हॉटेलमध्ये हाणामारी या सगळ्या गोष्टी सतत घडत असल्याने हॉटेल 'भाग्यश्री'ची कायम चर्चा होती.
त्यानंतर चक्क हॉटेल मालक नागेश मडके यांचे अपहरण करून त्यांना मारहाण यामुळे सध्या चर्चा फक्त हॉटेल भाग्यश्रीचीच आहे. त्यात आता पुन्हा एकदा हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी कारण अत्यंत गंभीर आहे. मडके यांचे अपहरण झाले होते या घटनेला दोन दिवस उलटले असतानाही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही, असा थेट आरोप नागेश मडके यांनी खासगी माध्यमाशी बोलताना केला आहे.
नागेश मडके यांनी यावेळी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, हल्ला करणाऱ्या युवकांचे हॉटेल मध्ये प्रवेश करतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. या फुटेजमध्ये हे युवक हॉटेलमध्ये प्रवेश करताना स्पष्ट दिसतात. त्यानंतर त्यांनी मडके यांना जबरदस्तीनं कारमध्ये टाकले. अत्यंत वेगानं कार चालवत 5 किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर सिद्धेश्वर वडगाव येथील पुलावरून फेकून दिले, मात्र यावेळी पुलाच्या बाजूला कठडा असल्याने मी खाली पडलो नाही या बाबत आपली पत्नी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेली होती. मात्र पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मडके यांनी केलाय. तसंच या प्रकरणात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.