शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अमरावती, नागपूर, पुणे, वसई, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर , नाशिक आणि जालना या ठिकाणी हे आंदोलन केले जात आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकाला हमीभाव ,दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठीक ठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या राज्यव्यापी आंदोलनाचे पडसाद नाशिक येथील चांदवड मध्येही पहायला मिळाले.
शेतकरी कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी मुबंई-आग्रा महामार्ग चांदवड चौफुलीवर प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी बांधवांनी आज (गुरुवार) चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयावरती हजारो ट्रॅक्टरसह बिऱ्हाड घेऊन मंत्रालयावरती धडक देणार आहे.