सर्पमित्र स्वतःचा जीव संकटात टाकून इतरांचा जीव वाचवतात. मुख्य म्हणजे यात ते सापलाही कुठलीही इजा न होऊ देता सुरक्षित ठिकाणी सोडतात. सापाला पकडताना अनेकदा साप या सर्पमित्रांना वैरी समजून यांचा चावा घेतात ज्यामुळे काहींना अपंगत्व तर काहींचा यात जीव देखील जातो. आता याच सर्पमित्रांना नवीन ओळख मिळणार आहे.
आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता 'फ्रंटलाइन वर्कर' होणार आहे. शासनाकडून सर्पमित्रांना 'फ्रंटलाइन वर्कर'चा दर्जा देण्याची तयारी असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी शिफारस केली आहे.
विशेष म्हणजे शासनाच्यावतीने या सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र ही दिले जाणार आहे. सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचाअपघात विमा मिळणार आहे. त्यांना 'अत्यावश्यक सेवा' आणि 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.