जगात विविध देशात युद्ध सुरु आहेत. ज्यामुळे हजारो नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. काही ठिकाणी तर अंतर्गत कारणामुळे झालेल्या युद्धात देशातील तरुणच देशातील इतर तरुणांच्या जीवाचे भुकेले झाले आहे.युद्धाचे सुद्धा काही नियम असतात. पण काही ठिकाणी ते सुद्धा पाळले जात नाहीत. सुदान देशातुन अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुदान देशातील उत्तर दारफुरची राजधानी असलेल्या अल-फाशेर शहरात मोठी हिंसक घटना घडली. एका अर्धसैनिक संघटनेने शुक्रवारी मशिदीवर ड्रोन हल्ला केला. यावेळी तिथे नमाज पठण करणाऱ्या ७० नागरिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला रॅपिड सपोर्ट फोर्सेस म्हणजेच आरएसएफने ड्रोनच्या मदतीने केल्याचे सुदान डॉक्टर्स नेटवर्क या स्थानिक संघटनेने सांगितले आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या निरपराध नागरिकांवर झालेल्या हल्ल्याला सुदान डॉक्टर्स नेटवर्कने घृणास्पद गुन्हा असे म्हटले आहे. 'द रेसिसटेंस कमिटीज इन अल फ़शर' या संघटनेने काल (१९ सप्टेंबर) ड्रोन हल्ल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मशिदीचे काही भाग ढिगाऱ्यात कोसळले असल्याचे आणि असंख्य मृतदेह विखुरलेले असल्याचे पाहायला मिळते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, यादवी युद्धात आतापर्यंत किमान ४०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १.२ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना घर सोडून पळ काढावा लागला आहे. या लोकांपैकी अनेकजण निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहे. हजारो कुटुंबे अजूनही सुरक्षिततेच्या शोधात आहेत. युद्धामुळे सुदानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.