सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखतच मुलगा आणि पुतण्या वाहून गेलाय. आई सोबत नदीवर कपडे धुवायला गेलेला मुलगा व पुतण्या आईच्या डोळ्यादेखत ओढ्यात वाहून गेले आहेत. सांगोल्यातील महिम येथून ही दोन मुले कासारगंगा ओढ्यात वाहून गेली आहेत. ग्रामस्थांकडून वाहून गेलेल्या मुलांची शोध मोहीम सुरु आहे.
घटस्थापनेपूर्वी कपडे धुवायला गेलेली ही दोन मुले पाण्याच्या वेगामुळे वाहून गेली आहेत. सध्या कासारगंगा ओढ्याला विराट नदीचे स्वरूप आले असून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे. श्रीधर किरण ऐवळे आणि सोमनाथ विठ्ठल ऐवळे अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. एक मुलगा पंधरा वर्षाचा असून दुसरा मुलगा तेरा वर्षाचा आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मुलांच्या शोधासाठी आता प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पंढरपूरवरुन NDRF ची बोट मागविण्यात आली आहे.