भारताच्या आयटी क्षेत्रात मोठी खळखळ उडवणारी बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TATA ग्रुपच्या Tata Consultancy Services कंपनीने 80,000 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचा दावा केला जात आहे. कंपनीत गेली १० ते १५ वर्षे काम करणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसह इतरांना नारळ देण्यात येत आहे. कारण न सांगता, अचानक बोलावून राजीनामा देण्यास सांगत आहेत. किंवा नोकरीवरून काढलं जात आहे. अशा परिस्थितीत टीसीएस कर्मचारी भीतीच्या छायेखाली काम करीत आहेत.
कंपनीने फक्त 2 टक्के म्हणजे सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाऊ शकते असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, 30,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते असं मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार समोर आलं आहे. तर, deccan herald या वेबसाईटनुसार, ८० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचं वृत्त आहे.
पुण्यातील एका कर्मचाऱ्याने मनी कंट्रोल या वेबसाईटला सांगितले की, 'मी टीसीएसमध्ये तब्बल १३ वर्षे काम केलं आहे. माझ्या प्रोजेक्टचं काम संपलं होतं. नंतर मला नवीन काम मिळालं नाही. नवीन प्रोजेक्ट मिळालं नाही. मी नव्या प्रोजेक्टसाठी विविध टीमशी चर्चा केली. मात्र, कुणीच प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या कंपनीत काम करीत असल्याचा खोटा आरोप माझ्यावर लावला. शेवटी मला राजीनामा द्यायलां भाग पाडलं. मी नकार दिल्यावर थेट कामावरून काढलं. इतकंच नाही तर, माझ्याकडून ६ ते ८ लाखांची वसुली करीत होते'.
कंपनीला विरोध केल्यास दुसऱ्या नोकरीवर परिणाम होईल या भीतीमुळे कर्मचारी गप्प राहतात. न्यायालयात गेले तरी वर्षानुवर्षे खटले चालतील, पैसा तसेच वेळ खर्च होईल. मानसिक तणाव वाढण्याचीही शक्यता आहे, अशी भीती त्यांना वाटते.
दरम्यान, FITE, UNITE, आणि AIITEU सारख्या अनेकआयटी संघटनांनी आरोप केला की, टीसीएसकडून हजारो कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. FITE सचिव प्रशांत पंडित यांनी सांगितले की, ३० ते ३५ वर्षे कंपनीला दिल्यानंतर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनाही ३० मिनिटात कामावरून काढलं जात आहे.'
टीसीएसने या वादावर अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. कंपनी मौन बाळगून आहे. आता सर्वांचे लक्ष ९ ऑक्टोबरकडे आहे. टीसीएस तिमाही निकाल जाहीर करेल. पहिल्यांदाच या वादावर भाष्य करेल, अशी अपेक्षा आहे.