पहलगाम हल्ला ते अमेरिकन टॅरिफ ; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विविध मुद्द्यांवर भाष्य
पहलगाम हल्ला ते अमेरिकन टॅरिफ ; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विविध मुद्द्यांवर भाष्य
img
दैनिक भ्रमर
आज विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर राज्यात ठिकठिकाणी दसरा मेळावे पार पडत आहे. तर काही मेळावे रात्री पार पडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज शताब्दी वर्ष आहे. १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरातील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल. या कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. 


या विजयादशमी उत्सवात घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके, यूएसए यांसारख्या विविध देशांतील अनेक विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले आहेत.या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नागपुरातील रेशमबाग मैदानातून संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या संबोधनात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम हल्ला आणि टॅरिफच्या मुद्द्यांवर भाष्य केले. “काही महिन्यांपूर्वी पहलगामसारखी दुर्घटना झाली. धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या झाली. या घटनेनंतर सेना आणि सरकारने ठामपणे उत्तर दिले. आपण सर्वांशी मैत्री ठेवावी, पण आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला समर्थ आणि सजग राहणे आवश्यक आहे”, असे मोहन भागवत म्हणाले.

यावेळी मोहन भागवत यांनी अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणाचा उल्लेख केला. “अमेरिकेने जे नवीन टॅरिफ धोरण लागू केले आहे, त्याचा फटका सर्वांना बसत आहे. त्यामुळेच जगात परस्पर संबंध निर्माण करणे आवश्यक आहे, कारण आपण एकटे जगू शकत नाही. पण ही निर्भरता नाईलाज बनू नये. त्यामुळे आपल्याला या गोष्टीला मजबुरी न बनवता, आत्मनिर्भर होऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे”, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Rss |
इतर बातम्या
Join Whatsapp Group