आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी विनिंग शॉट मारत चर्चेत आलेला क्रिकेटपटू रिंकू सिंग आता एका गंभीर प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. रिंकू सिंगकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, ही धमकी थेट अंडरवर्ल्ड डॉन डी-कंपनीकडून आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

अंडरवर्ल्डच्या टार्गेटवर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग आला आहे. रिंकू सिंगला ३ वेळा धमकी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या धमकीमुळे क्रिकेटजगात एकच खळबळ उडाली आहे. रिंकू सिंगकडून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चक्रे फिरवत काही आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाने खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याला धमकीचे फोन येत होते. झीशानकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. तपासात उघड झाले की, या आरोपीने भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग याच्याकडूनही खंडणीची मागणी केली होती. या आरोपींची नावे मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नविद अशी असून, त्यांना वेस्ट इंडिजमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजने त्यांना भारताच्या ताब्यात दिले.
तीन वेळा पाठवले धमकीचे मेसेज
5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी नेमके 7 वाजून 57 मिनिटांनी पहिला संदेश पाठवला. त्या संदेशात त्याने लिहिले होते की, “आशा आहे तुम्ही ठीक असाल. मी तुमचा सर्वात मोठा चाहता आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही केकेआर संघाकडून खेळत आहात. रिंकू सर, मला खात्री आहे की एक दिवस तुम्ही आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचाल. साहेब, एक विनंती आहे, जर तुम्ही थोडी आर्थिक मदत करू शकलात, तर अल्लाह तुम्हाला आणखी बरकत देईल, इंशाअल्लाह.”
या संदेशाला कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे नवीदने 9 एप्रिल 2025 रोजी रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी रिंकू सिंगला दुसरा संदेश पाठवला, “मला 5 कोटी रुपये हवे आहेत. वेळ आणि ठिकाण मी ठरवीन. तुमची खात्री पाठवा.” या दुसऱ्या खंडणीच्या संदेशालाही रिंकू सिंगकडून उत्तर मिळाले नाही. यानंतर 20 एप्रिलला सकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी त्याने इंग्रजीत आणखी एक संदेश पाठवला, “Reminder! D-Company.”
नवीद हा बिहारमधील दरभंगा जिल्ह्याचा रहिवासी आहे. 28 एप्रिल रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वप्रथम त्याच्यावर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली, आणि त्यानंतर रेड कॉर्नर नोटीसही जारी झाली. या कारवाईमुळे अखेर नवीदला अटक करणे शक्य झाले.