निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट ? २ मित्रपक्ष भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा
निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट ? २ मित्रपक्ष भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा
img
वैष्णवी सांगळे
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.  मात्र या निवडणुकीपूर्वीच भाजपाला जोरदार धक्का बसू शकतो. जागावाटपावरून भाजप आणि मित्रपक्षांमध्ये मतभेद सुरु असल्याच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाद्वारे काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांबाबत घोषणा करण्यात आली. बिहारमधील विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये होणार असून ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान होणार आहे आणि ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान पार पडणार आहे. मतदानाचा निकाल हा १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला जाईल.


यादरम्यान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि अन्य मित्र पक्षांमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चा सुरु असताना मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागावाटपावरुन सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमुळे बिहारमध्ये एनडीएमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सोशल मीडिया अकाउंटवरुन सूचक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी वडिलांचा उल्लेख करताना 'जुर्म करो मत, जुर्म सहो मत। जीना है तो मरना सीखो, कदम-कदम पर लड़ना सीखो' असे म्हटले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मंत्री चिराग पासवान यांनी ३५ जागांची मागणी केली होती. पण भाजपने फक्त २५ जागा देण्याची तयारी दाखवल्याने चिराग पासवान नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

तर जीतन राम मांझी यांनी बुधवारी (८ ऑक्टोबर) सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या 'कृष्ण की चेतावनी' या कवितेला जोडून एक कविता लिहिली आहे. या पोस्टवरुन त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. पक्षाला १५ हून कमी जागा मिळाल्यास आम्ही निवडणूक लढवणार नसल्याचे इशारा दिल्याचे पीटीआयचे वृत्त आहे.

दोन्ही बड्या नेत्यांच्या नाराजीमुळे निवडणुकीपूर्वीच भाजपाला धक्का बसू शकतो याचा थेट परिणाम बिहारच्या राजकारणावर पडू शकतो. पण हा परिणाम काय असेल हे पुढील दिवसात स्पष्ट होईल. 
NDA |
इतर बातम्या
Join Whatsapp Group