सातारा जिल्ह्यातील फलटण महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. अशातच आता या प्रकरणात राहुल गांधींनीही उडी घेतली आहे. महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे.
ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. त्यांनी याप्रकरणी भाजपवर निशाणा साधला. महिला डॉक्टरच्या आत्महत्याप्रकरणात जी न्याय लढाई सुरू आहे. त्यासोबत काँग्रेस पक्ष असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी एक्सवर याविषयी एक पोस्ट लिहिली आहे.

राहुल गांधींचे ट्वीट काय?
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टरने बलात्कार, मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. कोणत्याही सभ्य समाजासाठी ही घटना त्रासदायक आहे. एक चांगली डॉक्टर, जी दुसऱ्यांच्या दुःखात मदतीला धावून जात होती. भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील दोषींनी तिचा छळ केला. जनतेच्या रक्षणाची ज्याच्यावर जबाबदारी होती, त्यानेच या निरागस मुलीवर अत्याचार केला. तिचे शोषण केले. रिपोर्टनुसार भाजपशी संबंधीत काही प्रभावशाली लोकांनी तिच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
सत्तेचे संरक्षण असल्याने आणि त्या विचारधारेने तिचा जीव घेतल्याचे हे उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही तर संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांच्या पाठीशी उभी ठाकते, तेव्हा त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा तरी कशी करणार? महिला डॉक्टरची आत्महत्या ही भाजप सरकारच्या अमानवीय आणि संवेदनहीन चेहरा स्पष्ट करते. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आता भीती नाही तर न्याय झाला पाहिजे, असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले.