राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने कंत्राटी पद्धतीने ३५०० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. पण थांबा तुम्ही एनटी प्रवर्गातून असाल तर ही तुमच्यासाठी काही आनंदाची बाब नाही , कारण या ३५०० जागांमध्ये एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही. यामुळे एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
इतक्या जागा असूनही या भरतीमध्ये एनटी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एनटी प्रवर्गातील विद्यार्थी, उमेदवारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर आता आमदार धनंजय मुंडे यांनी देखील याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्र लिहून ही जाहिरात रद्द करण्याची, व नव्याने प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांची ट्विटर अकाऊंटवरील पोस्ट
दि. ४ नोव्हेंबर, २०२५ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) १९७४ जागा व वैद्यकीय अधिकारी (गट - अ) १४४० जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यातील समूदाय आरोग्य अधिकारी पदाच्या जाहिरातीत एन टी - डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी भरतीच्या जाहिरातीत एन टी प्रवर्गातील अ,ब,क,ड या चारही प्रवर्गांसाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही.
राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी वरील पदांसाठी तयारी करत असून या जाहिरातींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे.
तरी कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही या दृष्टीने या दोन्हीही जाहिराती स्थगित करून सर्वसमावेशक पद्धतीने सदर जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात याव्यात, ही विनंती.
राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ४ नोव्हेंबर २०२५ रोजी समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदाच्या सुमारे १९७४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिराती मध्ये एन टी डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र. ०१/२०२५ ४ नोव्हेंबर २०२५ यान्वये एकूण १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून या जाहिराती मध्ये एन टी प्रवर्गातील अ, ब, क, ड या चारही प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही.
सरकार आता धनंजय मुंडेंच्या या मागणीची दखल घेऊन एनटी प्रवर्गातील उमेदवारांचा विचार करणार का, हे लवकरच स्पष्ट होईल